आम्ही तंबाखूचे सेवन करणार नाही, मुंबईकरांनी घेतली शपथ

पोलिसनामा ऑनलाइन टीम – जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मुंबईत विविध संस्थांनी आणि शासनस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळांने आयोजित कार्यक्रमात मुंबईकरांनी तंबाखू सेवन करणार नाही. अशी शपथ घेतली आहे. तर पी. डी. हिंदुजा रुग्णालयच्या नो स्मोकिंग स्ट्रीट मोहिमेत सहभागी होऊन हजारो मुंबईकरांनी स्वाक्षरी केली आहे.

मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती आणि महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळांने महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्मचारी, अधिकारी आणि मुंबईकरांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली आहे. यावेळी सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. घोले म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा सर्वांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. तंबाखूचे हे जीवघेणे व्यसन वेळीच थांबले नाही तर २०२० ते २०३० पर्यंत जगातील सुमारे १०० कोटी लोक तंबाखूपासून होणाऱ्या रोगांचे बळी ठरतील.

यामध्ये २० ते ३० वयोगटातील ४० टक्के लोक असू शकतात. तर नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या, येणाऱ्या वर्षात शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, धार्मिळ स्थळे यांच्या १०० मीटर पासून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती कायदा अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येईल.तसेच जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मुंबईतील कॅडल रोडला नो स्मोकिंग स्ट्रीट घोषित करण्यासाठी पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलने मोहिम सुरू केली आहे.

कापड बझार जंक्शन आणि चैत्यभूमी हा रस्ता नो स्मोकिंग स्ट्रीट म्हणून जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. या मोहिमेत मुंबईकरांना सहभागी करून घेण्यासाठी नो स्मोकिंग स्ट्रीटच्या मागणीच्या पत्रावर स्वाक्षरी करून घेण्यात आली. हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन देण्यात येणार आहे.