खुशखबर ! ‘सोने-चांदी’च्यादरात लक्षणीय ‘घट’

पोलिसनामा ऑनलाईन – सोने तसेच चांदीच्या दराने गेल्या काही दिवसातील दरवाढीने विक्रमी टप्पा गाठला होता. तोळ्याला 56 हजार रुपयांपुढे वाटचाल करणारे सोने तसेच चांदी किलोसाठी 78 हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. दरम्यान, सोने आता 10 ग्रॅमसाठी 52 हजार रुपयांवर उतरले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार, खरेदीदारांचाही ओघ वाढला आहे.

महिन्याभरात सोने दर थेट 40 टक्क्यांनी वाढले. दर यापुढे गेले तर आपली संधी जाईल या धास्तीने, टाळेबंदीसारख्या कालावधीत सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणूनही अनेकांनी खरेदी सपाटा लावला. याच जोरावर अनेक तज्ज्ञांनी सोन्याचे नजीकच्या कालावधीतील अंदाजआकडे 65 हजार ते अगदी 80 हजार रुपयांपर्यत नेऊन ठेवले होते. सोन्याच्या वायद्यामध्ये दोन दिवसांत 56,000 रुपये ते 50,000 रुपये अशी 11% पडझड झाली होती. तोच भाव 55,500 ते 52,400 रुपये म्हणजे 6 टक्क्यांहूनही पडला आहे. बुधवारी सोने वायदे बाजार व्यवहारात 50,000 रुपयांच्यादेखील खाली घसरून आता परत 51,000- 51,500 रुपयांपर्यंत सुधारले आहे. तर चांदीनेदेखील 78,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवरून आठवडयाभरात बुधवारी 61,000 रुपयांच्या खाली घसरून आता 65,000 रुपयांच्या दरम्यान स्थान राखले आहे. गेल्या दोनच दिवसांत सोने 10 टक्के तर चांदीच्या कि मती 20 टक्क्याने कोसळल्या आहेत. बाजारात चढ-उतार होत राहतील आणि सध्याची जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहाता सोने दरात 10 ग्रॅमसाठी 48,200 रुपयांपर्यंत घसरण काही दिवसांत शक्य असल्याचे सांगितले जाते.