वीज बिलात सवलतीचे संकेत; उद्धव ठाकरे बैठक घेणार

मुंबई : उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत दिली जणार नाही, असे जाहीर केल्यानंतर राज्यात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यातच विरोधकही आक्रमक झाल्याने महाविकास आघाडी सरकारला नरमाईचे धोरण घेण्यास भाग पडल्याचे दिसत आहे. वीज बिलाच्या सवलतीसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा झाली आहे. याविषयावर राज्य सरकार आज पुनर्विचार करणार असल्याचे समजते.

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा वीज बिलाबाबत लोकांच्या तीव्र असलेल्या भावना काही मंत्र्यांनी मांडल्या. तसेच सवलत देण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केल्याचे सूत्रांकडून समजले. या बैठकीत उर्जामंत्री राऊत यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याने आज याबाबत पुनर्विचार होऊ शकतो.

राज्याच्या ऊर्जा विभागाने अर्थमंत्र्यांकडे 1800 कोटी रूपयांची मागणी वीज बिलाच्या सवलतीसाठी केली होती. मात्र, आर्थिक अडचणीमुळे ही मोठी रक्कम देण्यास अजित पवार राजी नसल्याचे समजते. म्हणूनच उर्जामंत्र्यांनी या घोषणावरून घुमजाव केले होते.

दरम्यान, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांच्या वीज बिलात सवलती देण्यासाठी ऊर्जा विभागाने दिलेल्या निधीच्या प्रस्तावावर विचार करण्याची विनंती केली. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्य सचिव संजय कुमार यांनी महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात घेतलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत सादरीकरण केले.