भाजपच्या मुख्यालयाबाहेर सन्नाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेहमी विजय साजरा करण्यासाठी सज्ज असणाऱ्या भाजपा दिल्ली मुख्यालयाबाहेर आज  सन्नाटा पसरला आहे .२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपाचा हा पहिला पराभव आहे. भाजपाचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश आले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपाकडून छत्तीसगड राज्य मिळवले आहे. राजस्थानदेखील भाजपाच्या हातून निसटताना दिसत आहे.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल असल्याचं स्पष्ट आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशात आघाडी घेतलेला काँग्रेस पक्ष सध्या मागे पडला असून पुन्हा एकदा भाजपाने आघाडी घेतली आहे. सध्या मध्य प्रदेशात दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढाई सुरु असल्याचं दिसत आहे. मध्य प्रदेशमधील निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदी कोण याची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावे चर्चेत आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी संसदेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निवडणुकीच्या निकालावर बोलणं टाळलं होतं. एरव्ही देशभरातल्या कार्यकर्त्यांची गर्दी असणाऱ्या दिल्ली मुख्यालयाबाहेर आज मात्र शुकशुकाट आहे. २०१९ च्या निवडणुकीआधी भाजपासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे. एकूणच यावरुन भाजपात चिंतेंचं वातावरण असल्याचं स्पष्ट दिसत आहे.