धुळे : नारायण अपार्टमेंटमधील डाॅक्टरचे घर फोडले, अर्धा किलो चांदी लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील मधुबन कॉलनी जवळील यशराज अपार्टमेंटमधील (फ्लॅट नंबर 9) व श्री नारायण अपार्टमेंटमधील (फ्लॅट नंबर 2) फोडून चोरट्यांनी अर्धा किलो चांदी लंपास केली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी श्री नारायण अपार्टमेंटमधील डॉक्टर राजेंद्र वाडेकर (फ्लॅट नंबर 2) यांच्या लोखंडी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील अर्धा किलो चांदी चोरली. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या मधुबन कॉलनी जवळील यशराज अपार्टमेंटमधील सुधीर पांडुरंग कासार यांच्या (फ्लॅट नंबर 9) फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी आजूबाजूच्या फ्लॅटच्या दरवाजांच्या कड्या लावल्या. कासार हे बाहेरगावी गेले होते. कासार यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी काही चिल्लर चोरली.

चोरट्यांनी कासार यांचा दरवाजा फोडला त्यावेळेस बाजूच्या अपार्टमेंटमधील नागरिकांना जाग आली होती. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र फ्लॅटला चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्यामुळे नागरिकांना बाहेर येता आले नाही. त्यांनी पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला. परंतु चाळीसगाव रोड पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी सहाच्या दरम्यान बाजूच्या लोकांना आवाज दिल्यानंतर त्यांनी दार उघडले. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केली.

अपार्टमेंटमधील लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार चोरटे दोन मोटरसायकलवर तोंडाला फडके बांधुन अपार्टमेंट मध्ये प्रवेश करताना कैद झालेले आहे. याच फोटोच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.