नवर्‍यानं 2 पत्नींना एकाच वॉर्डातून दिली उमेदवारी ?, जाणून घ्या वास्तव

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन –  सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. अशावेळी फोटो, व्हिडीओमधील व्यक्तींना नाहक मनस्ताप सहन करण्याशिवाय गत्यंतर नसते. असाच काहीसा प्रकार भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पिंपळास येथे घडला आहे. कुणीतरी खोडसाळपणाने एक मॅसेज व्हायरल केला आहे. मात्र त्यामुळे म्हस्के कुटुंबियांना त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यात ग्रामीण भागात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भिवंडी तालुक्यातल्या ग्रामीण भागात 15 जानेवारीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यासाठी गावोगावी प्रचार शिगेला पोहचला आहे. यापैकी पिंपळास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मात्र सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघी शिवसेना पुरस्कृत ‘श्री अग्निमाता ग्रामविकास पॅनल’च्या उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक 4 (ड) मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के यांचे फोटो असलेल बॅनर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे दोघींच्या पतींची सारखी असलेली नावे. या दोघींच्या पतींचं नाव कल्पेश आहे. ‘याला बोलतात डेरींग ! दोन्ही बायका एकाच वार्ड मध्ये उभ्या केल्यात, अशा मेसेजसह सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के यांचा फोटो असलेला बॅनर व्हायरल झाला आहे. मात्र प्रत्यक्षात सुजाता आणि कोमल यांचे पती वेगवेगळे आहेत. मात्र कुणीतरी खोडसाळपणे दोघांचा पती एकच असून त्यानं दोघींना एकाच वॉर्डातून उमेदवारी दिल्याचा मेसेज व्हायरल केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे म्हस्के कुटुंबीयांना मनस्ताप भोगावा लागत आहे. सुजाता आणि कोमल म्हस्के यांच्या पतीचे नाव एकच (कल्पेश) आहे. मात्र प्रत्यक्षात कल्पेश म्हस्के नावाच्या दोन व्यक्ती आहेत. कल्पेश बारक्या म्हस्के आणि कल्पेश सुरेश म्हस्के अशी दोघांची नावे आहेत. कल्पेश बारक्या म्हस्के यांचा कल्पेश सुरेश म्हस्के हा चुलत भावाचा मुलगा लागतो. 2016 मध्ये कल्पेश बारक्या म्हस्के यांचा विवाह सुजाता यांच्याशी झाला. तर कल्पेश सुरेश म्हस्के 2017 मध्ये कोमल यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले. आता कोमल व सुजाता या दोघीही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकाच वॉर्डातून उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या नावातील सारखेपणामुळे त्यांच्या बॅनरचा फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे त्यांच्या पतींनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.