‘मेडिटेशन’ खरचं सोपं नाही, पण एकदा जमलं की त्याला ‘चॅलेंज’ नाही, जाणून घ्या अगदी सोप्या अन् उपयोगी टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन – मन शांत राहण्यासाठी अलीकडे जो तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्यासाठी मन एका जागी राहिले पाहिजे ना ? डोळे बंद करुन ध्यान धारणेचा प्रयत्न केला तर, मनात असंख्य विषय घोळत असतात. अशाने मन शांत होण्या ऐवजी जास्तच अशांत होते. मेडिटेशन करणाऱ्या सर्वाना हा प्राथमिक अनुभव येत असतोच. कारण, मेडिटेशन हे काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्याकरता सराव आवश्यक असतो. तर आज आपण तो कसा करायचा याबाबत जाणून घेणार आहोत.

सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मन शांत करणे. त्यात, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टीत रमलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच पेलण्यासारखे. पण सरावाने आणि सकारात्मक विचार करुन कोणीतही असाध्य गोष्ट साध्य करता येते.

१. एकावेळी एकच काम करा.
वेळ वाचवण्यासाठी आपण चार कामे एकवेळीच करु पाहतो. पण त्याने एकही कामाला उचित न्याय मिळत नाही. टीव्ही-जेवण, गाणी – व्यायाम, गप्पा-काम अशी अनेक चुकीची समीकरणे आपण जोडलेली आहेत. अगदी अंघोळ करतेवेळी गाणी म्हणण्यापेक्षा अंघोळीच्या वेळी अंघोळीचा आनंद आणि गाण्याच्या वेळी गाण्याचा आनंद घेण्याची सवय शरीराला लावली, तरच दोन्ही गोष्टींचा उचित आनंद घेता येईल. तसे करणे, हीच मेडिटेशनची प्रथम पायरी आहे.

२. कामावर लक्ष द्या
ज्यावेळी आपण लहान मुलांना सांगत असतो, लक्ष देऊन अभ्यास कर. अर्थात अभ्यास करताना बाकीच्या गोष्टींचा विचार करु नको. मात्र, याच सूचनेचे पालन आपण करतो का ? नाही. अनेकदा आपण देहाने एकीकडे आणि मनाने दुसरीकडे उपस्थित असतो. तसेच होऊ न देता, हाती घेतलेल्या कामावर तन-मन केंद्रित करण्याची सवय लावली पाहिजे. मगच ध्यानधारणा आपोआप जमेल.

३. दैनंदिन आयुष्याकडे मेडिटेशन थेरेपी म्हणून पहा
मेडिटेशन हा शब्द येताच स्थिर, शांत, स्थब्ध बसलेली व्यक्ती, असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तोही मेडिटेशनचा प्रकार आहेच, पण दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टींचा भरभरून आनंद घेणे, प्रत्येक गोष्ट नीट समजावून घेणे, शिकणे या गोष्टी मेडिटेशन थेरेपी अर्थात एखाद्या उपचाराप्रमाणे काम करतात आणि आपले मन आटोक्यात आणून ध्यानधारणेसाठी तयार करतात.

४. सकाळची वेळ निवडा
वरील गोष्टी समजून घेतल्या असेल तर ध्यानधारणेच्या सरावास सुरुवात करता येईल. त्यासाठी सकाळी उठल्यावर, मोबाइल न पाहता शांत चित्ताने डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांची गर्दी नसते. म्हणून मन एकाग्र होते. तरी सुद्धा विचार येत असतील तर येउद्या. काहीवेळात तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यान धारणेसाठी तयार होईल.

५. ध्यान करताना संगीत लावू नका
प्रत्येक गोष्टींमधून मन अलिप्त ठेवण्यासाठी ध्यान धारणा करण्यात येते. त्यावेळी संगीत ऐकत ध्यान धारणा केली असता, मन गाणे ऐकण्यात रमून जाईल आणि गाण्या बाबत डोक्यात विचार येतील. अशा वेळी कोणतेही संगीत न ऐकता आपल्याला श्वासाचे संगीत ऐकायचे आहे, हे लक्षात ठेवा.