नारायण राणेंना भाजपाविरोधीचा सूर भोवणार ?, भाजपाकडून हकालपट्टीची मागणी

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमान पक्षाच्या विकास यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी भाजपवर केलेली टीका टिप्पणी त्यांच्या खासदारकीच्या अंगलट येणार आहे असे दिसते आहे. त्यांच्या या टीकांवरून भाजपाच्या खासदारकीवरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा भाजपकडून करण्यात येत आहे.
भाजपाविरोधीचा सूर भोवणार ?
नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या राणेंना भाजपने आपल्या कोट्यातून खासदारकी देऊ केली होती. त्यामुळे सध्यातरी नारायण राणे तांत्रिकदृष्ट्या भाजपचे खासदार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची राज्यभरात विश्वास यात्रा होणार आहे. याची सुरुवात सिंधुदुर्गात अनेक सभांमधून झाली. विशेष म्हणजे या सर्व सभांना स्वतः पक्षाध्यक्ष राणे उपस्थित होते. प्रत्येक सभेमध्ये नारायण राणेंचा भाजपविरोधी सूर ऐकायला मिळाला.
भाजप सरकारचे अपयश हा राणेंच्या टीकेचा मुद्दा होता. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेत राणेंचा समाचार घेतला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील स्वाभिमान पक्ष आणि भाजपमधील दुफळी प्रकर्षाने जाणवत आहे. याचा प्रत्यय कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि भाजप कार्यकर्ते यांच्यातील राडेबाजीने आला होता.

त्यामुळे आता जिल्हा भाजपकडून थेट राणेंची हकालपट्टीची मागणी होत आहे. त्यामुळे स्वाभिमान आणि भाजपमधील दुफळी अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात नारायण राणेंबाबत भाजप काय निर्णय घेणार? हेच पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

पुण्याचा भावी खासदार मीच होणार : खा. संजय काकडे