सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला पहिला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, रेल्वे प्रवासादरम्यान ‘लागण’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला ‘कोरोना’ पॉझिटिव्हचा रुग्ण सापडला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

१९ मार्चला आलेल्या मंगलोर एक्सप्रेसमधून या रुग्णाने प्रवास केला आहे. त्याच्याशी संपर्क आलेली त्याची बहिण २१ मार्च रोजी मुंबईला गेली असून त्याच्या सूचना मुंबईतील प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी प्रवास केलेल्या एस ३ डब्यातील प्रवाशांची संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले की, मंगलोर एक्सप्रेसने हा आपल्या आईला घेऊन १९ मार्चला कणकवली रेल्वे स्टेशनला आला होता. प्रवाशाच्या आईला खोकला असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसर्‍या दिवशी रेल्वेतून प्रवास केलेल्या तिच्या त्या मुलालाही रुग्णालयात दाखल केले. दोघेचे रिपोर्ट पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट आज २६ मार्चला मिळाले. त्यात मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असून इतर तीन रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडल्याने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णाला होम क्वारंटाइन सांगितले असल्याने तो इतर कोणाच्या संपर्कात आलेला नाही. या मुलाची बहिण ही २१ मार्चला मुंबईला गेली आहे. बहिणीच्या तपासणीसाठी मुंबईमधील प्रशासन तिला ताब्यात घेणार आहे.