विधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा ‘खुलासा’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ते कधी भाजपमध्ये प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कोकणात पोहचली असून सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी भाजप प्रवेशाबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. मी भाजपत प्रवेश करणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर माझा विश्वास आहे. भाजपच्या तिकीटावरच आमच्या संघटनेचे आमदार निवडणूक लढणार आणि पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे हे राज्यसभेचे भाजप पुरस्कृत खासदार आहेत. त्यांचा अद्याप औपचारिक भाजप प्रवेश झालेला नाही. दुसरीकडे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करणार का हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

शिवसेना-भाजपचं काहीही ठरलं तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणारच, असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातच पक्षप्रवेश का नाही केला, यावर बोलताना राणे म्हणाले, भाजप प्रवेश मुंबईतच व्हावा, अशी माझी इच्छा आहे. तो लवकरच होईल. युती झाली तर कणकवलीची जागा कुणाला मिळणार, यावर ते म्हणाले की, युती झाली किंवा नाही तरी फरक पडत नाही. तो माझा प्रश्न नाही. माझा भाजप प्रवेश नक्की आहे आणि माझे कार्यकर्तेही माझ्याबरोबर पक्षप्रवेश करणार. मी ज्या पक्षात असेन त्याचंच पारडं जड असणार, असाही दावा त्यांनी केला.

 

You might also like