‘या’ जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आयएसओ (ISO) मानांकीत

सिंधुदुर्ग : पोलीसनामा आॅनलाईन – सिंधुदुर्ग पोलीस दल आता स्मार्ट ठरल्याचं दिसत आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. इतकेच नाही तर सिंधुदुर्गात लवकरच टुरिझम पोलीस तयार करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग येथे आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणात पोलिसांसाठी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे आयएसओ मानांकन प्राप्त झाली आहेत. त्यामुळे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट अहे.” याशिवाय केसरकर यांच्याहस्ते या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल, समीर रुपगल आदी उपस्थित होते.

पोलीस हा गुन्हेगारांना धाक आणि सर्वसामान्य जनतेला आधार वाटला पाहीजे अशी कार्यपद्धती निर्माण करा, असा सल्ला केसरकर यांनी उपस्थित पोलीस वर्गाला दिला. इतकेच नाही तर येत्या वर्षभरात संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे कारण जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात टुरिझम पोलीस तयार करण्याची घोषणा केसरकर यांनी यावेळी केली. पर्यटन जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी मोठे आव्हान असून हे आव्हान जिल्हा पोलीस समर्थपणे पेलतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. गावा-गावातील पोलीस पाटलांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे डोळे बनून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.