सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे आणि उद्योग श्रेत्रासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

तसेच कला क्षेत्रात एस.पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बी.बी. लाल यांना पद्म विभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये 10 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे. सरकारने सात जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यामध्ये पार्श्वगायक एस.पी बालसब्रमण्यम यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सहा जणांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी पुरस्कार प्राप्त सर्वांचे ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील पुरस्काराचे मानकरी
परशुराम आत्माराम गंगावणे (कला)
नामदेव सी कांबळे (साहित्य आणि शिक्षण)
गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)
जसवंतीबेन जमनादास पोपट (उद्योग आणि व्यापार)
सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)
रजनीकांत श्रॉफ (उद्योग आणि व्यापार)