‘एखाद्या वाक्याचं भांडवल कशाला करायचं ?’ सिंधुताई सपकाळांकडून इंदोरीकर महाराजांची ‘पाठराखण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून गेल्या आठ दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोक त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. तर काही नेत्यांनी आणि सामान्य माणसांनी त्यांची बाजू देखील घेतली आहे. या सुरु असलेल्या वादात आता प्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी देखील उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या की, इंदोरीकर महाराजांकडून कीर्तनामध्ये पौराणिक दाखले देताना एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर त्याचं एवढं भांडवल का करता? असा प्रश्न सिंधुताईंनी उपस्थित केला आहे. हा वाद काही कारण नसताना जास्त वाढवला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

इंदोरीकरांनी वक्तव्य केलं होते की, ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे त्यांनी ओझर येथील एका कीर्तनात म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं होतं. या वाक्यामुळं त्यांनी लेखी माफी देखील मागितली होती. इंदोरीकरांनी माफी मागितल्यानंतर सिंधुताई सकपाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, इंदोरीकर महाराजांचं योगदान फार मोठं असून त्यांनी प्रबोधनाच्या मार्गाने तरुणांना वाईट मार्गातून बाहेर काढले आहे. तसेच स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र देखील दिला आहे. त्यांनी वाईट-रुढी परंपरा जाव्यात म्हणून अनेक प्रयत्न केले आहेत. अशावेळी त्यांच्याकडून एखादं चुकीचं वाक्य बोललं गेलं असेल तर त्याचं इतकं भांडवल करू नये त्यांनी स्पष्ट केले.

सिंधुताईंनी सल्ला दिला की, त्यांनी त्यांचं काम असेच सुरु ठेवावे. तसेच सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकरांच्या टीकाकारांना सांगितलं की इंदोरीकरांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घ्यावी आणि वाद मिटवून घ्यावा. असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान इंदोरीकरांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून ते म्हणाले होते की, माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने जास्तीचा विपर्यास केला. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

तसेच भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, जर गुन्हा दाखल झाला नाही तर, इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे जाऊन अजून काय वळण घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

You might also like