महाराष्ट्राला ‘हे’ 3 देश Remdesivir देण्यास तयार, केंद्राच्या परवानगीनंतर खरेदीची प्रक्रिया सुरु होणार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णासाठी वरदान ठरणा-या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी ठाकरे सरकार थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा विचार करत आहे. याबाबत विदेशी कंपन्यांशी प्राथमिक बोलणी झाली असून सिंगापूर, इजिप्त आणि बांगलादेश येथील कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा साठा पुरवण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंतीही राज्याने केंद्र सरकारकडे केली आहे. त्यानुसार केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार सध्या केंद्राकडून होणाऱ्या रेमडेसिवीर पुरवठ्यावरच विसंबून आहे. राज्यातील करोनाचा उद्रेक पाहता सध्या दररोज 70 हजार व्हायल्सची गरज असून प्रत्यक्षात 26 ते 27 हजार व्हायल्स दरदिवशी उपलब्ध होतात. आंतराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदीची परवानगी मिळाल्यास राज्य हा तुटवडा भरून काढू शकणार आहे. दरम्यान रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही मुद्दा उपस्थित केला. रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे नमूद करत परदेशातून रेमडेसिवीर आयात करण्याची परवानगी राज्याला द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याच्या बैठकीत केली आहे.