#MeToo: ‘जेव्हा घडलं, तेव्हा तोंड का नाही उघडलं?’: लकी अली 

दिल्ली: वृत्तसंस्था – अभिनेत्री तनुश्री दत्ता  ने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर #MeToo अंतर्गत  गैरवर्तनाचे आरोप केले आणि तेव्हापासूनच #MeToo या वादळाने अख्खा देश ढवळून निघाला . केवळ सिनेमा सुष्ट्रीच नाही तर राजकीय, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात देखील या वादळाने धुमाकूळ घातला. या  प्रकरणातील बऱ्याच घटना ह्या काही वर्षांपूर्वी घडून गेलेल्या होत्या. या घटनांबाबतची वाच्यता आत्ता करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून गायक लकी अली यांनी #MeToo  चळवळीबाबत आपले बेधडक मत व्यक्त केले आहे. ‘लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांनी इतक्या वर्षांनंतर बोलणं चुकीचं आहे. जेव्हा सगळं घडत होतं, तेव्हाच त्यांनी तोंड का नाही उघडलं, ‘असा प्रश्न लकी अली यानं केला आहे. नोएडा इथं झालेल्या एका लाइव्ह कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘आजकाल ‘# मीटू’ चळवळीद्वारे महिला त्यांच्यावर झालेल्या लैगिक शोषणाबद्दल बोलत आहेत. खरंतर या घाणेरड्या गोष्टी आधीच बाहेर यायला हव्या होत्या. आता अचानक प्रत्येकाला आठवू लागलंय की माझ्यासोबत असं झालं, तसं झालं. हे सगळंच हास्यास्पद आहे, ‘असं लकी अली म्हणाला. ‘चुकीची गोष्ट फार काळ लपून राहत नाही. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा. मौजमजा केलीय तर ती बाहेर येणारच. टेक्नॉलॉजीमुळं बरेच बदल झाले आहेत. जमाना बदलला आहे. त्यामुळंही अशा गोष्टी घडत आहेत, ‘असं तो म्हणाला.

#MeTo  तब्ब्ल … २० वर्षानंतर विनता नंदा यांची होणार  मेडिकल टेस्ट
#MeTo  मोहिमेअंतर्गत बलात्काराच्या आरोप असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्याविरोधात अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आलोकनाथ यांच्यावर  लेखिका- निर्माता विनता नंदा यांच्यांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून ओळखले जाणारे आलोकनाथ यांच्या विरोधात विनता नंदा यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता या घटनेच्या २० वर्षांनंतर पोलिसांनी विनता यांना मेडिकल टेस्टसाठी बोलवले आहे.
विनता नंदा यांनी केली नाराजी व्यक्त 
 माध्यमांशी बोलताना विनता नंदा यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  आलोकनाथचे खरे रुप समोर आणण्यासाठी मी माझी शारीरिक चाचणी करेल, असे विनता नंदा यांनी म्हटले आहे. आलोकनाथ यांच्याविरोधातील तक्रार दाखल करूनही या प्रकरणात फारसे काही घडले नाही. तक्रार दाखल केल्यानंतर ३ आठवड्यानंतर पोलिसांनी मला बोलवले आणि आता आम्ही एफआयआर दाखल करणार. एफआयआर दाखल केल्यानंतर आलोकनाथ यांना अटक केली जायला हवी किंवा त्यांची चौकशी व्हायला हवी होती. पण आता माझीच चौकशी होत आहे. मीच माझे आरोप सिद्ध करावे, याची जबाबदारी माझ्यावरचं येऊन पडलीय. आता मला वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. तेही २० वर्षांनंतर. मला ही चाचणी करावीच लागेल. तेव्हाच  केस पुढे जाईल, असे पोलिस म्हणत आहेत, असे विनतानंदा यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले आहे.
विनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती. एका पार्टीनंतर मी एकटी घरी जात होते. त्यांनी मला लिफ्ट देण्याची आॅफर दिली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मी कारमध्ये बसले. त्यानंतरचे मला अंधूक आठवते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. मी बेडवरुन उठू शकले नाही. याबद्दल मी माझ्या मित्रांना सांगितले, परंतु सर्वांनी या घटनेला कायमचे विसरुन जाण्याचा सल्ला मला  दिला, असे विनता नंदा यांनी म्हटले होते.  विनता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदृल हिनेही आलोक नाथवर गैरवर्तनाचा आरोप केला होता.