Coronavirus : देशात पहिल्यांदाच 24 तासात ‘कोरोना’चे 52 हजारपेक्षा जास्त नवे पॉझिटीव्ह, बधितांचा आकडा 16 लाखांच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत 15 लाख 83 हजार 792 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. एका दिवसात प्रथमच कोरोनाची 50 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. 24 तासात देशभरात कोविड-19चे विक्रमी 52 हजार 263 नवे रूग्ण वाढले. तर 775 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशात मरणार्‍यांचा आकडा 35 हजारांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 10 लाख 6 हजारपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत.

भारतात कोरोना संसर्गाचे पहिले प्रकरण 30 जानेवारीला समोर आले होते. यानंतर एक ते पाच लाखांपर्यंत केस होण्यासाठी 146 दिवस लागले होते, परंतु 5 ते 15 लाख केस म्हणजे बाकी 10 लाख संसर्गाची प्रकरणे होण्यास अवघे 32 दिवस लागले आहेत.

देशात आतपर्यंत 10 लाख लोक रिकव्हर

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात आता कोरोनाच्या 5 लाख 28 हजार 242 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 34 हजार 968 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली बातमी ही आहे की, आतापर्यंत 10 लाख 20 हजार 582 लोक बरे झाले आहेत.

अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त वेग

भारत तिसरा देश आहे, जेथे कोरोना व्हायरसच्या 15 लाख केस समोर आल्या आहेत. अमेरिका आणि ब्राझील यांनी खुप अगोदरच हा आकडा पार केला आहे. अमेरिकेत तर यावेळेस 45 लाखांपेक्षा जास्त केस आहेत. ब्राझीलने 25 लाख केस पार केल्या आहेत. या दरम्यान, भारताची चिंता वाढली आहे, कारण आहे येथील कोरोना वाढण्याचा वेग.

भारताने 5 लाखांवरून 16 लाखांचा आकडा अवघ्या 34 दिवसा गाठला आहे. हा अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त वेग आहे. ब्राझीलला यासाठी 36 आणि अमेरिकेला 40 दिवस लागले होते.

महाराष्ट्रात कोरोना केस 4 लाखांच्या पुढे

महाराष्ट्रात कोविड-19ची सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहेत. येथे संक्रमितांचा आकडा 4 लाखांच्या पुढे गेला आहे. यामुळे आतापर्यंत 14 हजारपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. वाढती प्रकरणे पाहता महाराष्ट्रात 31 आणि त्रिपुरामध्ये 4 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.

संसर्गाच्या प्रकरणात दिल्ली तिसर्‍या क्रमांकावर

तर, दिल्लीत कोरोनाच्या आतापर्यंत 1 लाख 32 हजार 275 केस समोर आल्या आहेत. संसर्गाच्या प्रकरणात दिल्लीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु, टॉप-10 राज्यांमध्ये येथे सर्वात कमी 10 हजार 887 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. येथे सर्वात जास्त 28 हजार 329 अ‍ॅक्टिव्ह केस 27 जूनला होत्या.

उत्तर प्रदेशात 3 हजार 458 नवी प्रकरणे

याशिवाय उत्तर प्रदेशात मागील 24 तासात कोरोनाची 3 हजार 458 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यासोबतच संक्रमितांचा आकडा वाढून 73,951 झाला आहे. यामध्ये 44,520 लोक बरे झाले आहेत. मागील 24 तासात 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकुण मृतांची संख्या 1,497 झाली आहे.

या राज्यात सर्वात जास्त मृत्यू

देशात कोरोनामुळे मरणार्‍यांचा आकडा बुधवारी 35 हजार झाला. 24 तासात महाराष्ट्रात सर्वात जास्त 298 मृत्यू झाले. येथे मरणार्‍यांचा आकडा 14 हजार 463 झाला आहे. कर्नाटकात 90 रूग्णांनी जीव गमावला. येथे मरणार्‍यांची संख्या आता 2147 झाली आहे. तर, तमिळनाडुत 82 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मरणार्‍यांची एकुण संख्या आता 3741 झाली आहे. आंध्र प्रदेशात 65 लोकांचा मृत्यू झाला असून येथे एकुण मृतांची संख्या आतापर्यंत 1213 झाली आहे.

आतापर्यंत 64% कोरोना रूग्ण झाले बरे

रोज सापडणार्‍या रूग्णांची संख्या 50 हजारपर्यंत पोहचली आहे, तर बरे होणार्‍यांची संख्या सुद्धा 40 हजारांच्या पुढे गेली आहे. रूग्ण वाढत असले तरी रिकव्हरी रेट सुद्धा सतत वाढत आहे. मात्र, रिकव्हरी वाढण्याचा वेग थोडा मंदावला आहे. देशात आतापर्यंत एकुण 64% कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत झाल्या इतक्या टेस्टींग
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 81 हजार 90 हजार 382 टेस्टींग करण्यात आल्या आहेत. तर, बुधवारपर्यंत एकुण 4 लाख 46 हजार 642 सॅम्पलची तपासणी करण्यात आली.