1 जानेवारी 2020 पासुन ‘इथं’ सिंगल युज प्लास्टिकवर बंदी, नियम तोडल्यास 50 हजाराचा ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच केरळ मध्ये मोठे बदल होणार आहेत. केरळ मध्ये १ जानेवारी २०२० पासून सिंगल यूज प्लास्टिक (Single Use Plastic) वर बंदी घातली जाणार आहे. केरळ सरकारने मागील महिन्यातच सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. याशिवाय सिंगल यूज प्लास्टिकच्या इतर वस्तूंच्या उत्पादनावरही बंदी घातली जाणार आहे.

PM मोदींनी सुरू केली होती सिंगल यूज प्लास्टिक विरोधात मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल यूज प्लास्टिक विरूद्ध मोहीम सुरू केली होती. 2022 पर्यंत देशाला सिंगल यूज प्लास्टिक पासून मुक्त करण्याचे लक्ष्य मोदी सरकारने ठेवले आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या श्रेणीत फक्त एकदा वापरले जाणारे प्लास्टिक, जसे की पाण्याच्या बाटल्या आणि दुधाचे पाकिटे इत्यादींचा समावेश होतो.

या प्लास्टिकच्या वस्तूंवर घातली जाणार बंदी:
केरळ सरकारने प्लास्टिक कॅरी बॅग, प्लास्टिक सीट, कूलिंग फिल्म्स, प्लास्टिक प्लेट्स, कप, थर्माकोल आणि स्टायरोफोम आधारित फॅन्सी वस्तू आणि इतर वस्तूंवर बंदी घातली आहे. तसेच निर्यात केली जाणारी प्लास्टिक उत्पादने, आरोग्य क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू आणि कंपोस्ट प्लास्टिकपासून बनवलेल्या उत्पादनांना बंदीमधून वगळण्यात आले आहे.

नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. नियम मोडणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या अन्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, स्थानिक संस्था सचिव आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेले अधिकारी याबाबत कारवाई करू शकतात.

50 हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद
या नवीन कायद्यात बंदीचा भंग करणाऱ्या उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. पुन्हा जर त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती केली तर 25,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. तिसऱ्यांदा जर पुन्हा गुन्हा घडला तर 50,000 रुपये दंड होणार आहे आणि दुकान/प्रतिष्ठान ची परवानगी रद्द केली जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/