साहेब, लोकं ‘कोरोना’च्या कॉलर ट्यूनला वैतागलेत : रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागील 5 महिन्यांपेभा अधिक कालावधीपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण, ही कॉलर ट्यून आता बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीनेदेखील अशी मागणी केली होती. आता त्यानंतर, आता आमदार रोहित पवार यांनीही कोरोना कॉलर ट्यूनचा लोकांना वैताग आला आहे, असं म्हटलंय.

कोरोनाबाबात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने लॉकडाऊनमध्ये कोरोनाची ट्यून अ‍ॅक्टीव्हेट केलीय. प्रत्येक फोन युजर्संना नंबर डायल केल्यानंतर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती दिली जात आहे. परंतु आता बर्‍यापैकी जनजागृती झालीय आणि या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतोय. तसेच फोन लागत नाही, अशा तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होत आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, असे ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यास, नेटीझन्सने बाळा नांदगावकरांची बाजू घेतली आहे. तसेच हि रास्त मागणी असल्याचे म्हटले होते. आता, आमदार रोहित पवार यांनी देखील केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केलीय.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोरोनाच्या कॉलर ट्यूनबद्दल प्रश्नार्थक पोल घेतलाय. कोरोनाच्या कॉलर ट्यूनसाठी दुसरा पर्याय हवा का? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी विचारला होता. त्यावर, सुमारे 88 टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. केवळ 12 टक्के नेटीझन्सने नको, असे म्हटलंय. आमदार रोहित पवार यांच्या या पोलमध्ये 3009 जणांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

आमदार रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन यासंदर्भातील पोस्ट शेअर केलीय. त्यामध्ये, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंती केलीय. कोरोना विषाणूच्या कॉलर ट्यूनला लोकं वैतागले आहेत. त्यामुळे, आपण याचा फेरविचार करावा, लोकांमध्ये जागृती झाली आहे. आता काहीतरी सकारात्मक कॉलर ट्यून ऐकवली तर त्यांना लढण्यासाठी तेवढी ऊर्जा तरी मिळेल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय.