पूर्व लडाखमध्ये ताबारेषेवर ‘स्फोटक’ स्थिती !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गलवान खोर्‍यातील धुमश्चकृीनंतर पूर्व लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरूच आहेत. रेझांग-ला येथील मुखपरीजवळ भाले, लोखंडी शिगा आणि अन्य शस्त्रे हाती घेतलेल्या चिनी सैन्याने भारतीय जवानांना चिथावणी दिली. भारताचा भूभाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न जवानांनी पुन्हा हाणून पाडला असून,प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थिती स्फोटक बनली आहे.

प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारतीय लष्कराच्या चौक्यांच्या जवळ आले होते. त्यांनी भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याने माघार घेतली. मात्र, माघारी फिरताना चिनी सैन्याने गोळीबाराच्या 10 ते 15 फैरी हवेत झाडल्या, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. भारतानेच प्रत्यक्ष ताबारेषेचे उल्लंघन करून गोळीबार केल्याचा दावा चीनने केला होता. तो फेटाळून भारतीय लष्कराने चीनचा कांगावा उघड केला.

भारतीय जवानांनी प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडलेली नाही. तसेच कुठलीही आक्रमक कृती किंवा गोळीबार केलेला नाही. पँगाँग सरोवर परिसरातील संरक्षणदृष्टया महत्त्वाच्या ठिकाणांवर भारतीय जवान तैनात आहेत. चिनी सैन्याने गोळीबार करून भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला,असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.