रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघा डॉक्टरांसह 6 जणांना अटक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन –   पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणा-या दोघा डॉक्टरांसह 6 जणांना मंगळवारी (दि. 11) रात्री अटक केली आहे. आरोपींकडून विविध कंपनींचे 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 10 रेमडेसिविर इंजेक्शन, तसेच 1 लाख 10 हजारांच्या 2 दुचाकी तसेच 12 लाखांच्या दोन चारचाकीसह एकूण 15 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्तांचे विशेष पथक, शहर गुन्हे शाखा व एफडीएने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

शुभम कुमोद सोनटक्के (24 रा. ठाकूर निवास चपराशीपुरा), शुभम शंकर किल्हेकर (24, रा. धोबीनाला वडाळी), डॉ. अक्षय मधुकर राठोड (24, रा. कार्टन नंबर 4 भातकुली रुग्णालय), पूनम भीमराव सोनोने (26 रा. भेडगाव ता. बार्शीटाकळी जि. अकोला, ह.मु. अमरावती), अनिल गजानन पिंजरकर (38 रा. सर्वोदय कॉलनी काँग्रेसनगर), डॉ. पवन दत्तात्र्य मालुसरे (35, रा. कॅम्प रोड फ्रेजरपुरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात औषधी प्रशासनाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. अटक केलेल्या आरोपींची कोरोना चाचणी केली असता, त्यातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याला उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. तर पाच आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, पीएसआय राजकिरण येवले, विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.