मेघालयात पोलिसांनी मोठा कट उधळून लावला, 1525 किलो स्फोटके जप्त, 6 आरोपीला अटक

शिलाँग : वृत्तसंस्था – मेघालयात मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना य़श आले आहे. मेघालयच्या ईस्ट जयंतिया हिल्स जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि डिटोनेटर जप्त केले आहेत. तसेच याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध विस्फोटक कायदा आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गाडीत मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री या भागात सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. सर्च ऑपरेशन दरम्यान लाडरिमबाई पोलीस चौकी भागातील कोंगोंगमध्ये एका गाडीला पोलिसांकडून अडविण्यात आले. आसाममधील रजिस्टर क्रमांक असलेली गाडी पाहून पोलिसांना थोडा संशय आला. सहाय्यक पोलीस महानिरीक्षक जी. के. इंगराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमधून दहा पेट्या जप्त केल्या असून या पेट्यांमध्ये 250 किलो स्फोटक सापडली आहेत. स्फोटकांमध्ये 2000 जिलेटीन कांड्याचाही समावेश होता.

तसेच यासोबत 1000 डेटोनेटर जप्त केले आहेत. पोलिसांनी ही गाडी घेऊन जाणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. तसेच आरोपींच्या चौकशीदरम्यान आणखी काही आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार खलीहरियट भागातून आणखी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी घातलेल्या छाप्यात जवळपास 1275 किलो स्फोटके (10,200 जिलेटिन कांड्यांसहीत) 5000 डेटोनेटर जप्त केले आहेत. इंगराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत एकूण 1525 किलो स्फोटके जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.