पुण्यात साखळी चोरांचा हैदोस, १ तासात ६ साखळ्या हिसकावल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरात सकाळी सकाळी सोनसाखळी चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. समर्थ, विश्रामबाग, फरासखाना, वानवडी आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी एकापाठोपाठ ६ सोनसाखळ्या, मंगळसुत्रे हिसकावल्या आहेत. जवळपास १ ते दीड तासात चोरट्यांनी या साखळ्या हिसकावून पोबारा केला आहे.  शहरात सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून शहर पोलीस दल खडबडून जागे झाले आहे. पोलिसांकडून सर्वत्र नाकाबंदी केली जात आहे.

मध्यवस्तीतील ३ ज्येष्ठ महिला लक्ष्य
शहराच्या मध्य वस्तीतील लक्ष्मी रस्ता परिसराजवळ असलेल्या लोखंडे तालीम जवळ एक ज्येष्ठ महिला पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यानंतर काही वेळाच्या फरकाने फडके हौद चौकाजवळ एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. तर मध्यवस्तीत  आरसीएम कॉलेजजवळ ज्येष्ठ महिलेचे मंगळसुत्र हिसकावले गेले आहे.

वानवडी, बिबवेवाडी, समर्थच्या परिसरातही धूमाकूळ
वानवडी येथे एका पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाल्यानंतर चोरट्यांनी बिबवेवाडी परिसरात कॅनरा बँकेजवळून पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २ तोळ्यांचा दागिना हिसकावून नेला. पहाटे अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तात्काळ घरी जाऊन पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तर यानंतर समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडीचे मैदान येथे देखील एका ८३ वर्षाच्या महिलेचे ३ तोळ्यांचा दागिना लंपास केला. नलिनी उनवणे असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

१ तासात ६ सोनसाखळी हिसकावल्या

चोरट्यांनी सकाळी हा प्रकार एक ते दीड तासात करून पोबारा केला आहे. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी शरहात धूमाकूळ घालून पोबारा केला. सकाळी सकाळी तब्बल ६ सोनसाखळी, मंगळसुत्रं हिसकावून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. ६ ठिकाणी महिलांचे दागिने लुटले.

पोलीस खडबडून जागे

पोलिसांना या घटनांची माहिती उशीरा मिळाली. परंतु मध्यवस्तीसह इतर ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंदी केली. तर सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.

असा घटनाक्रम

७.३० – वानवडी जगताप चौकात, २ तोळे सोने

७.४५ – फडके हौद चौकात, अडीच तोळे,

८.४५ – लोखंडे तालीम, अडीच तोळे,

८.१० – सोमवार पेठ, ३ तोळे,

८.३० – बिबवेवाडी, रवि अपार्टमेंटजवळ, २ तोळे

८.४५ – फरासखाना येथे आरसीएम कॉलेजजवळ,