ICU ला कुलूप, मृतदेह पडून अन् सर्व डॉक्टर्स-कर्मचारीही फरार; दिल्लीतील घटना (Video)

गुरुग्राम : पोलीसनामा ऑनलाइन : देशभरात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा-सुविधाही देता येत नाही. त्यातच दिल्लीतील एका रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावरून आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

सायबर सिटी गुरुग्राममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. किर्ती रुग्णालयात 20 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील 6 जणांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले, त्यावेळी आयसीयूला कुलूप होते आणि त्यातील कर्मचारीही गायब असल्याचे दिसत आहे. मात्र, या व्हिडिओबाबत रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. त्यामध्ये त्यांनी समोर आलेला व्हिडिओ जुना असून, सध्याच्या परिस्थितीशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही एक हत्या असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. यातील धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असताना रुग्ण दगावत असताना डॉक्टरांनी पळ काढला.