Coronavirus : सोलापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 6 रुग्णांचा मृत्यू, 49 नवीन रुग्ण आढळले

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूर शहर व जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोनामुळे शुक्रवारी (दि.22) मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज (शनिवारी) पुन्हा सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापूरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तर आतापर्यंत 249 रुग्ण बरे झाले असून 270 जणांवर उपचार सुरु आहे.

आत्तापर्यंत 5475 व्यक्तींची कोरोना चाचणी झाली असून यातील 5423 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 4858 निगेटिव्ह तर 565 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. 52 अहवाल प्रलंबित आहेत. आज एका दिवसात 229 अहवाल आले यात 180 निगेटिव्ह तर 49 पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये 27 पुरूष आणि 22 महिलांचा समावेश आहे. आज जवळपास 25 रूग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आज मृत्यू झालेल्या 6 जणांमध्ये 3 पुरूष, 3 महिलांचा समावेश आहे.

आज मृत पावलेल्या अक्कलकोट मधला मारूती येथील 46 वर्षीय पुरूष, उत्तर कसबा पत्रा तालीम येथील 71 वर्षीय पुरूष, शिवशरण नगर एमआयडीसी येथील 52 वर्षीय पुरूष, मिलिंद नगर बुधवार पेठ येथील 69 वर्षीय महिला, मोदी परिसरातील 67 वर्षीय महिला, तसेच न्यू पाच्छा पेठ येथील 78 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्वांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करत असताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे.