पुणे महापालिकेतील 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पुणे विभागात आज एकाच दिवशी 200 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेत काम करणाऱ्या 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यापैकी दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

देशात कोरोनाचे संकट वाढत असून महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई बरोबरच मालेगाव, सोलापूरमध्ये देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. आतापर्य़ंत सर्व सामान्य नागरिक, डॉक्टर, नर्स आणि पोलिसांना कोरोनाच्या साखळीने विळखा घातला आहे. मात्र आता महापालिकेतील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. पुणे महापालिकेत काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

शेखर गायकवाड पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, पुणे शहरात कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आता तर महापालिकेच्या सेवेत असलेल्या सहा कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांनी माहिती देताना सांगितले की, पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कालपर्य़ंत 1702 संख्या होती. आज यामध्ये 200 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1905 झाली आहे. तर याच दरम्यान आज अखेर 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 99 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.