दगडूशेठ ट्रस्टच्या पुढाकाराने वाल्ह्याच्या पालखी तळावर सहाशे वृक्षांची लागवड

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पंढरपूर पालखी वारीचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे असतो. मुक्कामाचा हा तळ प्रसिद्ध आहे. या तळावर विविध जातींच्या सहाशे वृक्षांची लागवड श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.

डेरेदार वृक्षांमुळे हा मुक्कामाचा तळ अतिशय रमणीय होईल. निसर्गाच्या सानिध्यात वृक्षांच्या दाट सावलीत वारीतील वारकऱ्यांना मुक्कामात छान आनंद आनुभवता येईल. चिंच, वड, जांभूळ, पिंपळ असे घनदाट सावली देणारे वृक्ष येथे लावण्यात आले आहेत. हरित वारी मार्ग असा संकल्प ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी तीन वर्षांपूर्वी जाहीर केला होता. त्या संकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ट्रस्टच्या वतीने रोपे उपलब्ध करून देण्यात आली आणि वाल्हे ग्रामपंचायत तसेच वाल्हे आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ, पुरंदर तालुका पत्रकार पत्रकार संघाचे सदस्य यांच्या सहकार्यातून वृक्षांची लागवड नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. ट्रस्टच्या वतीने पुरंदर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दोन टँकर उपलब्ध करून दिले जातात. या टँकरद्वारे वृक्षांसाठीही पाणी देण्यात येत आहे. या वृक्षांची चांगली वाढ होईपर्यंत टँकरद्वारे पाणी देऊन त्यांची जोपासना करण्यात येईल असे ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिलजी रासने आणि कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांनी सांगितले. सध्याच्या उत्सवी काळातही वाल्हे येथे ही सेवा चालू असल्याचे सूर्यवंशी म्हणाले. टँकर चालक सुरेश शामराव पवार आणि प्रवीण शिंदे हे दोघेजणं अतिशय श्रद्धेने आणि नियमितपणे वृक्षांना पाणी देण्याची सेवा करत आहेत. हा सगळा भाग माळरान होते. आता त्यावर सावली देणारी झाडं बहरतील अशी भावना पवार आणि शिंदे यांनी व्यक्त केली.

संतांच्या आवडीची झाडे लावा, असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार तशाच झाडांची निवड करण्यात आल्याचे पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर कुदळे म्हणाले.

पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावातील जलाशयात साचलेला गाळ उपसण्याचे कांम ट्रस्टने केले. अलीकडच्या काळात तो तलाव पाण्याने ओसंडून वाहतो. पाण्याच्या चांगल्या झिरपण्यामुळे जलाशयाच्या आसपास छान हिरवाई झालेली आहे. ट्रस्टच्या वतीने तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दररोज एक लाख लिटर पाणी पुरवण्यात येते आणि आता पालखी मार्गावर, वाल्हे मुक्काम तळावर हरित वारी संकल्पाचा एक टप्पा आकाराला येत आहे. असंख्य लोकांच्या हातभारातून हा संकल्प सिद्धीस जाईल.