डिलीवरी बॉयला गंडवून त्याने पळविले सहा आयफोन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फ्लीपकार्टवरून सहा आयफोन, एक स्मार्ट वॉच मागवून डिलीवरी बॉयला फसवून एकाने तीन लाख रुपये किंमतीचे सहा आय़फोन घेऊन पळ काढल्याची घटना पाषाण येथे उघडकिस आली आहे. याप्रकऱणी एकाविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन नागेश घोडेकर (२७, वडारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन घोडेकर हे फ्लीपकार्ट कडून ऑर्डर करण्यात आलेल्या वस्तूंच्या डिलिव्हरीचे काम करतात. रविवारी ते कंपनीच्या वस्तू डिलीवरी साठी घेऊन निघाले. त्यांनी पाषाण येथील काही वस्तूंची डिलीवरी केल्यानंतर अमोल नावाच्या व्यक्तीचा त्यांना फोन आला. त्यानंतर ऑर्डर केलेले सहा आय़फोन कंपनीचे मोबाईल व एक स्मार्ट वॉच मीच ऑर्डर केली आहे. त्यातील सहा आय़फोन मला द्या. आणि एक स्मार्ट वॉच आमच्या एक मॅडम आहेत. त्यांना ती द्यायची आहे. असे सांगून आयसर इन्स्टीट्यूट येथील डी इमारतीमध्ये घेऊन गेला. त्या मॅडमला स्मार्ट वॉच नेऊन देण्यासाठी घोडेकर गेले. त्यानंतर इमारतीतील एका फ्लॅटमध्ये जाऊन त्यांनी महिलेला ती स्मार्ट वॉच दिली. त्यानंतर त्यांनी मी कसलीही वॉच मागविली नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते वॉच घेऊन खाली गेले. तेव्हा अमोल नावाचा व्यक्ती तेथे नव्हता त्याने तेथून २ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे सहा आयफोन मोबाईल घेऊन पळ काढला होता. त्यानंतर घोडेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.