नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी

रांची: वत्तसंस्था 
झारखंडमधील गढवा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री भूसुरुंगाच्या माध्यमातून स्फोट घडवून जवानांच्या तुकडीवर हल्ला केला.
या स्फोटात ६ जवान शहीद झाले. गढवामधल्या छिंजो परिसरात नक्षलवादी दबा धरून बसले असल्याची माहिती मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, चारही बाजूने घेरल्यानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्यात लावलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. ज्यात 6 जवान शहीद झाले. गढवातले पोलीस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या भ्याड हल्यात १o जवान जखमी झाले असून, हल्ल्यानंतर गढवा परिसराला छावणीचं स्वरूप आलं आहे. सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दुसरीकडे मंगळवारी झालेल्या नक्षली हल्ल्याच्या आधी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातही नक्षलवाद्यांनी असाच मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 9 जवान शहीद झाले होते, तर 6 जवान जखमी झाले.