LCB ची ‘धडक’ कारवाई ; राहत्या घरातून ६ लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जामखेड तालुक्यातील नान्नज गावात राहणाऱ्या अमजद निजाम पठाण याच्या राहत्या घरातून सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पठाण हा फरार आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक औताडे यांना खबऱ्याकडून नान्नज येथील अमजद पठाण याच्या घरात चोरीचा माल असल्याची माहिती मिळाली होती. यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे, पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, फकीर शेख, संभाजी कोतकर, संदीप दरंदले, रोहित मिसाळ आदींनी अमजद पठाण घरी छापा टाकला. झडती घेतली असता घरात लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा सापडला.

जप्त केलेला गुटखा जामखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य प्रतिबंधीत खाद्य पदार्थांमधे गुटख्याचा समावेश असल्याने अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर कारवाईची माहिती देण्यात आली आहे.