… म्हणून मंत्री छगन भुजबळ झाले होम क्वारंटाईन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे छगन भुजबळ स्वत: होम क्वॉरंटाइन झाले असून त्यांचे कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्यात येणार आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना करोनाची सूक्ष्म लक्षणे आढळल्याने सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ६ अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी,असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले होते. ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी गुरुवारी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा काल पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.

विश्वजीत कदम हे पुणे येथील घरी होम क्वॉरंटाइन झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांनी संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले आहे. याअगोदर विश्वजीत कदम यांच्या कुटुंबातील आमदार मोहनराव कदम यांच्यासह चौघांना कोरोनाची लागण झाली होती.