नर्मदेत बोट उलटून ६ जणांना जलसमाधी ; ३६ जणांची प्रकृती गंभीर

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन – नर्मदा नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत एकूण ६२ प्रवासी होते. यातील ३६ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज (मंगळवारी) दुपारी  नंदुरबारमधील धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ ही दुर्घटना घडली. जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटनेतील अन्य प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. अतिशय दुर्गम भागात ही दुर्घटना घडली असल्यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे.

संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीमध्ये स्नान करण्याकरिता येथे मोठ्या संख्येने भाविक आले होते. नर्मदा नदीत फेरफटका मारण्यासाठी ६२ प्रवाशांना घेऊन एक बोट जात होती. त्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरण्यात आले होते. त्यामुळे ही बोट उलटली असे सांगण्यात येत आहेत.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु झाले. या बोटमधील काही भाविकांना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ३६ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना नंदुरबार आणि धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.