खून प्रकरणी ६ जणांना जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून एकाचा खून आणि दोन जणांना गंभीर दुखापत करणार्‍या सहा जणांना सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली. पिंपरी पोलिसांच्या हद्दीत फेब्रुवारी 2015 मध्ये खुनाची घटना घडली होती.

नागेश साहेबराव गायकवाड, महेश ऊर्फ जॅकी मच्छिंद्र कांबळे, ओंकार सचिन बादल, विकी बबन ओव्हाळ, दिपक श्रीरंग शिंदे, राजू भीमराव हाके अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध रामा भीमराव गोटे (रा. बालाजीनगर, भोसरी) या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून आणि दगड, सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून खुन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच मयताचे मित्र राजेश स्वामी आणि लखन गायकवाड यांना गंभीर दुखापत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी पंधरा जणांची साक्ष न्यायालयात घेतली. जखमींनी दिलेली साक्ष आणि त्यास पुरक वैद्यकीय पुरावा आरोप सिद्ध करण्यास पुरेसा ठरला. न्यायाधीश ए.व्हि.रोटे यांनी सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरला. आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनाविताना दंडापैकी 60हजार रुपये मयताचे कुटुंबियांना आणि प्रत्येकी तीस हजार रुपये जखमींना देण्याचे आदेश दिले.

घटनेपूर्वी एका हाॅटेलमध्ये दारु पितांना आरोपी आणि मयत, जखमींचे भांडण झाले होते. जखमी आणि मयत या प्रकारानंतर बालाजीनगरकडे जात असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. हि घटना 14फेब्रुवारी रोजी सायंकाळी भोसरी एमआयडीसी जवळ घडला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आर. पी. कुंटे यांनी केला होता.