अस्थिविसर्जन करून परतणाऱ्यांवर काळाचा घाला : अपघातात 8 ठार, 15 जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – नातेवाईकांच्या अस्थिविसर्जनाहून घरी परतत असताना झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. अस्थी विसर्जन करून परतत असताना चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींवर यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात उपचारा सुरू आहे. यामध्ये काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. हा अपघात आज सायंकाळी पाचच्या सुमारास कळंब-जोडमोहा मार्गावरील वाढोणा गावाजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जोडमोहा येथील बाबाराव वानखेडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी ग्रामस्थ आणि नातेवाईक चारचाकी वाहनातून वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे गेले होते. अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आटोपून ते परत येत असताना वाढोणा गावाजवळ वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या वाहनाची धडक एका झाडाला बसल्याने वाहन एका खोल खड्ड्यात कोसळले.
accident
या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामध्ये महादेव बावनकर (वय-53 रा. शेदुर्जना घाट), किसन कळसकर (वय-55), महादेव चंदनकर (वय-58), अमर आत्राम (वय-32 सर्व रा.जोडमोहा) आणि गणेश चिंचोलकर (वय- 52, महागाव) यांचा जागीच मृत्यू झाला. एका मृताचे नाव समजू शकले नाही.

अपघाताची माहिती मिळताच जोडमोहा पोलीसांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान दोन गंभीर असलेल्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जागीच 6 आणि उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 8 झाली आहे. जखमी असलेल्या काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा अकडा वढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.