पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर स्क्रॅच ; ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या वाहनाला अनोळखी व्यक्तीने स्क्रॅच मारला. यामुळे कर्तव्यावर बेजबाबदारपणा तसेच कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना गुरुवारी (दि.१४) रात्री निलंबीत केल्याचे आदेश काढले आहेत.

पोलीस हवालदार पंकड पांडे, चमनलाल नैताम, पोलीस शिपाई रोहित चव्हाण, नायक पोलीस शिपाई सुरेश चव्हाण, पोलीस शिपाई कैलास कलापार (नियुक्ती पोलीस मुख्यालय), पोलीस शिपाई छोटेलाल बिसेन (नियुक्ती रामनगर पोलीस ठाणे) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या वाहनावर गार्ड संरक्षणात तैनात होते. मंगळवारी पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षक यांच्या वाहनाला अनोळखी व्यक्तीने स्क्रॅच मारला. ही बाब पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या लक्षात आली.

विनिता साहू यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात निष्काळजीपणा, बेशिस्त व बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले. निलंबन कालावधीत कर्मचाऱ्यांचे अधिकार, कार्य काढून टाकण्यात आले आहे. हे निलंबन आदेश अमलात असेपर्यंत या कर्मचाऱ्यांना पुढील निलंबन मुख्यालय अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणे असेल असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

अर्जुनी मोरगावच्या ठाणेदारांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, सकाळी व सायंकाळी पोलिस ठाण्यात हजर राहून तेथे ठेवलेल्या हजेरी पथकावर स्वाक्षरी करावी लागेल, अन्यथा निर्वाह भत्ता देता येणार नाही. असेही त्यांनी बजावले आहे. पोलिस अधीक्षकांच्या या कारवाईने पोलिस कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us