क्रूर घटना : चिमुरड्याला ‘विवस्त्र’ करुन बसविले तापलेल्या फरशीवर ; पार्श्वभाग भाजला

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली असताना घरातून बाहेर पडणे शक्य होत नाही़, अशा वेळी आर्वी येथे एका ७ वर्षाच्या चिमुकल्याला नग्न करुन तापलेल्या फरशीवर (स्टाईल्स) बसवून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेश उर्फ अमोल ढोरे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसानी अटक केली आहे.

त्याने त्या चिमुकल्यावर चोरीचा आरोप करुन नग्न करुन उन्हाने तापलेल्या फरशीवर बसवले, त्यामुळे या चिमुकल्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. आर्वी येथील गुरुनानक चौकात जोगणामाता मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात शनिवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास हा मुलगा खेळायला गेला होता. यावेळी आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे हा सुद्धा मंदिर परिसरात पोहोचला. त्यानंतर आरोपीने मुलाला तू मंदिरात चोरी करत आहे असा आरोप करुन त्याला विवस्त्र करुन तापलेल्या फरशीवर बसवले. विना चपलीने जिथे उभे राहणे शक्य होत नाही, तिथे आरोपीने त्याला नग्नावस्थेत बसवले. एवढेच नाही तर क्रूर पद्धतीने मुलाला जबरदस्तीने स्टाईलवर दाबून धरले. स्टाईल्स तापलेली असल्याने मुलाला जोरदार चटके बसले. यामुळे चिमुकला जखमी झाला.

या प्रकारानंतर पीडित मुलगा रडत रडत घरी गेला. त्याने घाबरलेल्या अवस्थेत स्वत:वर झालेल्या अत्याचाराची माहिती आपल्या आईला सांगितली. झालेल्या अत्याचाराचा जाब विचारायला मुलाची आई जोगणा माता मंदिरात पोहोचली. त्यावेळी आरोपी अमोल ढोरे याने पीडित मुलाच्या आईला चिमुकला दानपेटीतून पैसे चोरी करत होता, असे कारण सांगितले. वास्तविक पाहता दानपेटीला त्यावेळी कुलूप लागले होते. यावेळी मात्र आरोपीने चूक मान्य न करता शिवीगाळ करत मारण्याच्या उद्देशाने अंगावर चालून आल्याचे पीडित मुलाच्या आईचे म्हणणे आहे.

आरोपी अमोल हा दारूचा व्यवसाय करत असल्याचे पुढे आले आहे. तो याच परिसरात दारूविक्री करत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे सुद्धा पुढे आले आहे. पोलीस आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासत असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी पीडित मुलाच्या आईने समय सुचकता दाखवत अत्याचार झालेल्या जागेवर पेनाने निशाण करून ठेवले होते. यावेळी पंचनामा करत असताना पोलिसांनी त्या स्टाईलचा तुकडा काढून घेत जप्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’