PM-Kisan : योजनेचा 6 वा हप्ता अकाऊंटमध्ये नाही आला ? तर मग फक्त ‘या’ क्रमांकावर करा फोन, मिळेल सर्व मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये पाठवते. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये पाठविली जाते. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर सहावा हप्ता पाठविणे सुरू केले आहे. 1 ऑगस्टपासून सहाव्या हप्त्याप्रमाणे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जात आहेत. या वेळी सुमारे दहा कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

देशातील 14 कोटी शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे. ज्या शेतकर्‍यांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी त्यासाठी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा. पीएम किसान पोर्टलमार्फत सरकार या योजनेशी संबंधित सर्व सुविधा शेतकऱ्यांना पुरवित आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी योजनेशी संबंधित जवळपास सर्व कामे केवळ काही क्लिकवर करू शकतात.

टोल फ्री क्रमांक
जर आपण या योजनेत नोंदणीकृत असाल आणि आपल्या खात्यास अद्याप 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नसेल तर आपल्याला याची चिंता करण्याची गरज नाही. आपण टोल फ्री नंबरवर कॉल करून आपले म्हणणे मांडू शकता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. पीएम-किसान हेल्पलाईन 155261 किंवा टोल फ्री 1800115526 वर शेतकरी संपर्क साधू शकतात. याशिवाय 011-23381092 या क्रमांकावर शेतकरी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.

या पद्धतीने लिस्टमध्ये तपासा नाव
लाभार्थ्यांच्या यादीमध्ये शेतकरी त्यांची नावे देखील तपासू शकतात. यासाठी प्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. येथे, आपल्याला मुख्यपृष्ठावरील मेनू बारवरील फार्मर टॅबवर क्लिक करावे लागेल. यानंतर लाभार्थी यादीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. आता शेतकरी आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावाचे नाव टाकून गेट रिपोर्टवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर त्यांना पूूर्ण यादी मिळेेल, ज्यात शेतकरी आपले नाव तपासू शकतात.