चेहऱ्याच्या क्रिम्स किंवा मेकअपच्या वस्तूंचा थेट किडनीवर होतोय परिणाम, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  तुम्ही गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रिम किंवा इतर मेकअप साहित्य वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण या गोष्टींचा तुमच्या शरीरावर थेट परिणाम होतो. यात शरीराला घातक ठरणाऱ्या मर्क्युरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळं अशा क्रिम्स वापरण्यामुळं गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येत या क्रिम्स बाजारात विकल्या जातात.

तपासणीसाठी दिल्लीतल्या गफ्फार मार्केट येथून काही फेअरनेस क्रिम्सचे सॅम्पल घेण्यात आले होते. यात 48.10 ते 1 लाख 10 हजार पीपीएम इतकं मर्क्युरीचं प्रमाण आढळून आलं होतं. विशेष म्हणजे जगभरात या क्रिम्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मर्क्युरी वर्किंग ग्रुपमार्फत असा दावा करण्यात आला आहे. तब्बल 12 देशात झिरो वर्किंग मर्क्युरी ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपमार्फत करण्यात आलेल्या दाव्यानुसार सगळ्यात जास्त फेअरनेस क्रिम्स या आशियात तयार केल्या जातात.

तुम्हाला क्वचितच माहित असेल मेकअपच्या उत्पादनांचा सगळ्यात जास्त परिणाम हा किडनीवर होतो. मस्कारा तसंच डोळ्यांच्या मेकअपच्या वस्तूंमध्येही जास्त प्रमाणात मर्क्युरीचा वापर केलेला असतो. या उत्पदनांच्या वापरामुळं किडनी खराब होऊ शकते. शरीराचा आणि मर्क्युरीचा संपर्क आल्यानं नर्वस सिस्टीम आणि फुप्फुसांवर प्रभाव पडतो. याशिवाय पचनशक्ती मंदावणं, डिप्रेशन, त्वचेवर पुळ्या येणं, चट्टे येणं अशा काही त्वचेच्या गंभीर समस्यादेखील जाणवू शकतात.