पोलीसांचे कत्तलखान्यावर छापे ; गोहत्या करणाऱ्यास अटक 

वैजापूर(औरंगाबाद) : पोलीसनामा ऑनलाईन- पोलिसांनी छापा टाकून कत्तलखान्यातून सहा टन गोमांस जप्त केले असून २८ जिवंत जनावरे देखील पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात मध्य रात्रीच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात उघडकीस आली आहे. वैजापूर मधील भरतनगर भागात हा सर्व प्रकार घडत असल्याचे सत्य पोलीसांनी प्रकाशात आणले आहे.या छाप्यात भाकड गायी, वृद्ध झालेली बैलं आणि वासरांचा समावेश आहे.

भरतनगर भागात अवैधरित्या सुरु असणाऱ्या कत्तलखान्यात गोहत्येचा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या भागावर छापे टाकले आहेत. या प्रकरणी तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी पसार होण्यात यशस्वी झाली आहेत. त्या दोघांच्या शोधासाठी पोलीसांनी पथक रवाना केले आहे.वसीम उस्मान कुरेशी, शायेद उस्मान कुरेशी, शोएब उस्मान कुरेशी अशी या गोहत्या करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत.

जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचा पोलीसांनी पंचनामा केल्या नंतर ते गोमांस चाचणी करण्यासाठी जिल्ह्याच्या पशुवैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय विभागाचे सहायक आयुक्त एन. एन. चित्ते, पशूवैद्यकीय अधिकारी आर.एस. पेडगावकर यांच्या सहाय्याने गोमांसाची तपासणी झाल्या नंतर हे गोमांस पोलीस निगराणीत नष्ट करण्यात आले आहे.

पोलीसांनी छाप्यात कत्तलखान्यातून कुऱ्हाडी ,धारदार चाकू आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे  भाकड गायी , वृद्ध झालेली बैलं आणि वासरे अशी २८ गोवंशातील जनावरे जप्त करून गोशाळेत संगोपनासाठी पाठवून दिली आहेत. तर पोलीस कत्तलखान्यावर छापे टाकण्यासाठी आले असता अंधाराचा फायदा घेऊन आरोपींची १० टनांच्या जवळपास गोमांस गायब केले असल्याची माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींनी मिळवली आहे.