मुलांना पूर्ण झोप न मिळाल्यास आढळतात चिडचिडेपणा, डिप्रेशनची लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही, गेममुळे मुलं रात्री उशीरा झोपतात. त्यातच सकाळची शाळा असल्यास पुन्हा त्यांना सकाळी लवकर उठवले जाते. अशा परिस्थितीत त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप पूर्ण न होणे अतिशय गंभीर आहे. यातून अनेक समस्या उद्भवतात. अशा मुलांमध्ये डिप्रेशन आणि चिडचिडेपणाची बरीच लक्षणे आढळतात. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. हे संशोधन जर्नल स्लिप हेल्थमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या रॉचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी या समस्येवर संशाधन केले असून याबाबत या तज्ज्ञांनी सांगितले की, या संशोधनात मुलांची झोप आणि त्यांच्या मानसिक आरोग्य तसेच शाळेच्या सकाळच्या वेळेचा मुलांच्या झोपेवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी १४ ते १७ वयोगटातील १९७ विद्याथ्र्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये शाळा सकाळी ८.३० वाजताच्या अगोदर आणि सकाळी ८.३० नंतर असणाऱ्या मुलांना झोपेबाबत प्रश्न विचारण्यात आले.

विद्याथ्र्यांच्या झोपेची वेळ, झोपेचे एकूण तास, पुरेशी झोप मिळते का ? तसेच त्या मुलांमधील डिप्रेशन आणि चिडचिडेपणाची लक्षणे यांच्या नोंदी करण्यात आल्या. या अभ्यासाच्या अखेरीस संशोधकांना असे दिसून आले की, ज्या मुलांना पुरेशी झोप मिळत होती त्यांच्यामध्ये डिप्रेशन आणि चिडेचिडेपणाचे प्रमाण कमी होते. तर हे प्रमाण ज्या मुलांची शाळा ८.३० नंतर सुरु होते त्यांच्यामध्ये दिसून आले. शिवाय ज्या मुलांची शाळा ८.३० वाजता सुरु होते त्यांना पुरेशी झोप मिळत नव्हती. शाळकरी मुलांना ८-१० तास पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. ज्या मुलांची शाळा लवकर सुरु होते त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. आणि यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला दिसून आला.