फक्त झोपा काढण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी देणार एक लाख रुपये पगार !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कामावर असताना अनेकांना हवाहवासा असलेला हा ड्रीम जॉब आता सत्यात आला आहे. ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढून पैसे कमवण्याची संधी देशातील एक कंपनी देत आहे. झोपाळू लोकांसाठी ही सुवर्णसंधी असून काम करण्याऐवजी ऑफिसमध्ये झोप काढण्याचे 1 लाख रुपये मिळणार आहेत.

भारतातील एका कंपनीने स्लीप इंटरशिप सुरू केली आहे. त्यासाठी तुम्हाला कामासाठी नव्हे तर फक्त झोपण्यासाठी स्टायपेंड दिला जाणार आहे. बंगळुरूतील वेकफिट गादी बनवणार्‍या कंपनीने स्लीप इंटर्नशीप सुरू केली आहे. इंटर्नशिप दरम्यान तुम्हाला रोज नऊ तास झोपावे लागणार आहे. जर तुम्ही सलग शंभर दिवस हे करत राहिलात तर यासाठी तुम्हाला कंपनी एक लाख रुपये देणार आहे.

या दरम्यान स्लीप एक्सपर्ट, आहारतज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञ यांचे मार्गदर्शनही ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे. यासोबत तुम्ही कसे झोपता आणि तुमच्या झोपेच्या पद्धतीकडे बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. इंटर्नशीपसाठी तुमच्याकडे कोणतीही डिग्री असणे आवश्यक आहे. पण, हे काम मिळवण्यासाठी तुम्हाला झोप किती प्रिय आहे, हे कंपनीला पटवून द्यावे लागणार आहे.