कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यामुळं जाऊ शकते तुमच्या डोळयांची दृष्टी, संशोधनात झाला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजकाल लोक सुंदर दिसण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. काही लोक असे देखील आहेत जे चष्मा टाळण्यासाठी लेन्स लावतात परंतु या लेन्समुळे तुमचे डोळे खराब होऊ शकतात. यामुळे केवळ अनेक प्रकारचे संक्रमणच होत नाहीत तर यामुळे डोळ्यांना नुकसानही होऊ शकते. एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. संशोधनानुसार, एखादी व्यक्ती कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपला असेल तर त्याची दृष्टी देखील जाऊ शकते.

अ‍ॅनेल्स ऑफ इमर्जन्सी मेडिसिन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कॉन्टॅक्ट लेन्सेस घालताना व त्याचा वापर करताना थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तर त्यामुळे डोळ्याच्या कॉर्नियामध्ये गंभीर संक्रमण होऊ शकते. याशिवाय लेन्स लावून झोपी गेल्यास काही बाबतींमध्ये तर डोळ्यांना कायमचे नुकसान देखील होऊ शकते.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कॉन्टॅक्ट लेन्स लावून केवळ झोपणेच नाही तर डुलकी घेणे देखील इतके धोकादायक असते की यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. संशोधनात समोर आले की कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपी गेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये इतका गंभीर संसर्ग झाला होता की त्याला वाचवण्यासाठी डोळ्यांचे प्रत्यारोपण करावे लागले.