वाहनचालकांच्या दंडाच्या रकमेत जानेवारीपासून किरकोळ वाढ

पोलीसनामा ऑनलाईन – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रकमेत जबर वाढ आणि तुरुंगवासाची कठोर शिक्षा यामुळे या केंद्रीय वाहतूक नियमावलीतील सुधारणांना महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विरोध केला होता. त्यामुळे त्या लागू करण्याचा निर्णय घेतला नव्हता. मात्र आता केंद्रीय मोटारवाहन कायद्यातील सुधारणाबाबत केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांच्याशी चर्चा केली असून राज्यात जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ापासून ही नियमावली लागू होईल. तसेच दंडाच्या रकमेत किरकोळ वाढ करण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी सांगितले.

केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 1 सप्टेंबर 2019 मध्ये रस्ते अपघाताला आळा घाण्यासाठी तसेच बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी नवीन नियमावली देशात लागू केली होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केली होती. यात सीटबेल्ट न वापरल्यास 100 रुपयांऐवजी 1 हजार दंड, दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यास 1 हजार दंड किंवा तीन महिने वाहन परवाना रद्द, रुग्णवाहिकेचा रस्ता अडविल्यास 10 हजार रुपयांचा दंड आणि अथवा तीन महिने तुरुंगवास,परवाना नसताना वाहन चालविल्यास 5 हजार रुपये दंड, आणि अथवा तीन महिने तुरुंगवास अशा अनेक तरतुदी केल्या होत्या.

राज्यातही रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहनचालकांना व वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी आवश्यक तरतुदी लागू केली जाणार आहेत. मात्र दंडात मोठी वाढ न कररता किरकोळ वाढ केली जाणार आहे. दंडाची रक्कम ठरविण्याबाबत राज्य सरकारलाही अधिकार असून त्याबाबतच्या कायदेशीर बाबी तपासण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री परब यांनी सांगितले.