Video : अमेरिकेत इम्रान खान यांची पुन्हा ‘फजिती’, भाषणादरम्यान बलुचिस्तानच्या समर्थनार्थ ‘घोषणाबाजी’

वाशिंग्टन : वृत्तसंस्था – सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सातत्याने अपमानाचा सामना करावा लागत आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकन सरकारने साधी दखलही न घेतल्याने इम्रान खान यांना मेट्रोने प्रवास करावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी एका कार्यक्रमादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे इम्रान खान यांना फजितीला सामोरे जावे लागले. इम्रान खान वाशिंग्टन डीसीमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण देत होते. भाषणादरम्यान बलुच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यांनी बलुचिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. घोषणा सुरु असल्या तरी इम्रान खान यांचे भाषण सुरूच होते. सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढले.

दरम्यान, पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इम्रान खान यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नव्हता. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. इम्रान खान कतार एअरवेजच्या विमानानं सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अमेरिकेत पोहोचले होते. कतार एअरवेजच्या विमानातून अमेरिकेत दाखल झालेल्या इम्रान खान यांचा व्हिडीओ पीटीआयनं ट्विट केला आहे. यामध्ये खान एका सामान्य व्यक्तीसारखे विमानातून उतरताना दिसत आहेत. अनेकांनी यावरुन खान यांची खिल्ली उडवली.

काय आहे बलुचिस्तान प्रकरण

ब्रिटिश कालखंडात स्वतंत्र प्रांत असलेला बलुचिस्तान चार रियासतींमध्ये विभागलेला होता. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी बलुचिस्तानने पाकिस्तानमध्ये सामील व्हावे असा जीनांचा आग्रह होता. चारपैकी तीन रियासती पाकिस्तानमध्ये विलीन झाल्या परंतु बलुचिस्तानमधील कलात या रियासतीने अहमद यार खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात विलीन होण्यास नकार दिला आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर खान यांनी कलातच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

१९४८मध्ये पाकिस्तानच्या दबावाखाली कलात पाकिस्तानमध्ये सामील झाला आणि संपूर्ण बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग झाला. परंतु खान यांचा पाकिस्तानमध्ये कलातला विलीन करण्याचा निर्णय त्यांच्या भावाला मान्य झाला नाही. परिणामी पाकिस्तानी लष्कराविरोधात कलात मध्ये संघर्ष सुरू झाला. आणि विविध कारणांमुळे तो चिघळत गेला.

त्यातच १९५४मध्ये पाकिस्तानने “वन युनिट पॉलिसी” जाहीर केली. त्यानुसार पश्चिम पाकिस्तानचे चारही प्रांत एकत्र करण्यात आले. त्यामुळे बलुचिस्तानचे स्वतंत्र अतित्व निर्माण होण्याची शक्यताच संपुष्टात आली. यानंतरही सातत्याने बलुचिस्तान समर्थकांकडून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान बलुचिस्तानच्या समर्थनार्थ फलक झळकाविण्यात आले होते.

 

आरोग्यविषयक वृत्त