‘इथं’ कमी वयाच्या मुलींना जबरदस्तीनं बनवले जातं ‘आई’ आणि मग…

पोलीसनामा ऑनलाइन – आफ्रिकन देश नायजेरियामध्ये मुलांना जन्म देण्याचे कारखाने कार्यरत आहेत. ‘बेबी फार्मिंग’ नावाचा गोरख व्यवसाय येथे जोरात सुरू आहे. येथे दुसर्‍याच्या आनंदाच्या नावाखाली होत असलेल्या या व्यवसायाने भयानक रूप धारण केले आहे. कमी वयाच्या आफ्रिकन आणि परदेशी मुलींना येथे जबरदस्तीने गर्भवती करून मुलांना जन्मास घातले जात आहे. खरं तर, हा व्यवसाय नि:संतान जोडप्यांना बाळ विकण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. यासाठी निःसंतान जोडपी भरघोस रक्कम देण्यास तयार असतात. अशा परिस्थितीत काही महिला व मुली पैशाच्या लोभाने येथे येतात तर याच्या आडून येथे काही मुलींना विकत आणले जाते आणि त्यांना सक्तीने आई बनण्यास भाग पाडले जाते.

केवळ नायजेरियाच नाही, तर इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये देखील बेबी फार्मिंगसारखे व्यवसाय केले जातात. रुग्णालये आणि अनाथाअश्रमांसारख्या ठिकाणी गुप्तपणे हा व्यवसाय केला जातो. येथे तरुण मुलींना आई बनण्यास भाग पाडले जाते. त्यातील बहुतेकजण अनाथ किंवा गरीब असतात, म्हणून त्यांना जबरदस्तीने मान्य करण्यास भाग पाडले जाते.

नायजेरियात गुप्तपणे चालणारा हा व्यवसाय खूप धोकादायक बनला आहे. येथे बाळाला जन्म देणार्‍या मुली केवळ 14 ते 17 वर्षांच्या आहेत आणि त्यांची इच्छा असूनही त्या गर्भपात करू शकत नाही, कारण नायजेरियाच्या कायद्यानुसार अशी परवानगी नाही. त्याच गोष्टीचा फायदा माफिया म्हणजेच ‘बेबी फार्मर्स’ घेत आहेत आणि तीन ते चार लाख रुपयांना मुले विकत आहेत. त्याच वेळी, ज्यांना मुलबाळ होत नाही आणि त्यांना मुलाची इच्छा असते ते यास विरोध करीत नाहीत, कारण ही पद्धत वैद्यकीय उपचारांपेक्षा खूपच स्वस्त आहे.