४ हजार रुपयांची लाच घेताना लघू सिंचन अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या मंजूर अनुदान देण्यासाठी चार हजारांची लाच स्विकारताना शिंदखेडा पंचायत समितीमधील लघू सिंचन विभागाचा कनिष्ठ अभियंत्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शरद फकिरा पाटील (वय-५२) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज (मंगळवार) दुपारी सोनगीर बसस्थानकात करण्यात आली. या कारवाईने लघूसिंचन विभागातील लाचखोर कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी ३० वर्षीय तक्रारदार शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या आईची वायपूर शिवारात गट 100/अ 1 हेक्टर 21 शेतजमीन आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत दोन लाख 90 हजारांची सिंचन विहिर मंजूर झाली होती. विहिर खोदकामासाठी सुरुवातीला शेतकर्‍याच्या आईला एक लाख 76 हजार 880 रुपये प्राप्त झाले होते. उर्वरीत अनुदानाची रक्कम एक लाख 13 हजार 120 रुपये थकीत असल्याने हे बिल काढून देण्यासाठी शरद पाटीलने तक्रारदाराकडे चार हजारांची लाच मागितली होती. शेतकर्‍याला लाच द्यावयाची नसल्याने त्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सोमवारी (दि.१८) लाचेची पडताळणी करून आज सापळा रचण्यात आला. सोनगीर बसस्थानकाजवळील पुलाजवळ रक्कम स्वीकारत असताना शरद पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, जयंत साळवे, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, कैलास जोहरे, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.