मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचले; ‘स्मारक की मातोश्री- 3 ?’ बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संदीप देशपांडे यांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज स्मृतिदिनानिमित्त (Memorial Day) आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शिवसेना नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देत बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकावरून आज मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ‘स्मारक की मातोश्री- 3?’ (smarak-or-matoshri-3 ) असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी विचारला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन आठ वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, या काळात बाळासाहेबांचे स्मारक उभे राहू शकलेले नाही. मुंबईतील महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे हस्तांतरित केली होती. तसेच 2019 मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजनही झाले होते. मात्र, त्यानंतर हे काम पुढे सरकू शकलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेनेवर टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी महापौर बंगल्याचा एक फोटो शेअर करत स्मारक की मातोश्री-3 ?’ असा बोचरा प्रश्न विचारला आहे.