भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रँंकिंग घसरले : खासदार वंदना चव्हाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा क्रमांक आता २८ व्या क्रमांकावर गेला आहे, असे प्रसारमाध्यमांतून वाचल्यावर आश्‍चर्याचा धक्का बसला. केंद्रात, महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या कारभारामुळे पुण्याचा लौकीक घसरल्याचे स्मार्ट सिटीच्या रँकिंगमधून उघड झाले आहे. या वस्तुस्थितीला केवळ प्रशासनच नव्हे तर, सत्ताधारी म्हणून भाजपचे सपशेल अपयश आहे, असा आरोप खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी केला आहे.

पुणे शहर हे मुळातच स्मार्ट शहर आहे. गेल्या १५-२० वर्षांत शहराचा कायापालट झाला असून पुरेसा प्रमाणात पायाभूत सुविधाही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहराची वाढ झपाट्याने झाली. म्हणूनच स्मार्ट सिटी प्रकल्पात जून २०१६ मध्ये देशात पुण्याची दुसर्‍या क्रमांकाने निवड झाली. त्यावेळी पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा शहरातील १४ प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या उत्तम कामामुळे लाईट हाऊस, स्मार्ट क्लिनिक, प्लेस मेकिंग, स्मार्ट स्कूल, स्मार्ट स्ट्रीट, हॅपी स्ट्रिट, ई- बसची खरेदी आदी अनेक प्रकल्पांना सुरुवात झाली.

मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर स्मार्ट सिटीचे काम एकदम ठप्प झाले. गेल्या दहा महिन्यांत एकाही नव्या प्रकल्पाला सुरुवात झाली नाही आणि काम सुरू असलेला एकही प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही. स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांच्या नोंदीही केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांत महापालिकेला पोचविता आलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित असलेला निधीही केंद्र सरकारकडून मिळालेला नाही. परिणामी पुणे स्मार्ट सिटीची हेळसांड झाली. महापालिकेतील सत्ताधारी फक्त निविदां आणि त्यातील टक्केवारीमध्ये मग्न असल्यामुळे दैनंदिन कारभाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, हे स्मार्ट सिटीच्या या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे.

केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही महापालिकेला सहकार्य करीत आहे. तरीही शहरासाठी नव्या विकास प्रकल्पांची मांडणी आणि अंमलबजावणी भाजपला गेल्या दीड वर्षांत करता आलेली नाही. भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांचेही स्मार्ट सिटीकडे लक्ष नाही. तसेच पुण्यातून आमदार झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचेही स्मार्ट सिटी आणि महापालिकेतील कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या नाकर्तेपणामुळेच पुण्याचे रँकिंग घसरले आहे. त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर अन्य कोणावर फोडण्यापेक्षा भाजपने आपल्या कारभारात सुधारणा करावी आणि पुणेकरांचा विश्‍वासघात न करता, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करावी.

स्मार्ट सिटीसाठी दर आठवड्याला गुणांकन दिले जाते. त्यामध्ये मागील आठवड्यात पुणे स्मार्ट सिटी २८ क्रमांकावर गेली आहे. स्मार्ट सिटीचे वार्षिक गुणांकन आणि क्रमवारी ३० सप्टेंबरल जाहीर होते. मागीलवर्षी पुणे १७ व्या स्थानावर होते. मागील दहा महिन्यांत काही प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. यामध्ये एक उद्यान, स्विमिंग टँक व अन्य छोटे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. हे प्रकल्पांचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल. कोरोनाच्या साथीमध्ये स्मार्ट सिटीने ऍप विकसित करून रुग्णांची माहिती, त्यांच्यावर केल्या जाणार्‍या औषधोपचारांची अद्ययावत माहिती नोंद करण्यास आणि नियोजनास त्याचा चांगला उपयोग झाला आहे.