‘कोरोना’च्या महामारीमुळं सर्वत्र मंदी पण ‘इथं’ नोकरीची सुवर्णसंधी ! स्मार्टफोन बनवणार्‍या कंपनीत डिसेंबरपर्यंत 50 हजार जणांची होणार भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- लॉकडाऊनमध्ये अनेकांना नोकरी गमववी लागली आहे. परंतु आता लवकरच स्मार्टफोन इंडस्ट्रीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. कारण आता डिसेंबर अखेरपर्यंत स्मार्टफोन निर्माता कंपन्या 50,000 कामगारांची भरती करणार आहे.

केंद्र सरकारनं प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटीव्ह ही योजना सुरू केली होती. भारतात स्मार्टफोन बनवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं या योजनेची सुरुवात केली होती. डिक्सन, लावा, फॉक्सकॉन, विस्ट्रोन आणि सॅमसंग अशा कंपन्यांनी आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्मार्टफोन उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी डेटानुसार, जुलैमध्ये जवळपास, 50 लाख नागरिकांनी रोजगार गमावला आहे.

केंद्र सरकारची योजना

दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं 1 एप्रिल 2020 रोजी लार्ज स्केल इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींगसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंमटीव्ह ही प्रोत्साहन देणारी योजना अधिसूचित केली आहे. या योजनेमुळं इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींगला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि मदत मिळणार आहे.

फोन निर्मितीत 1100 टक्के वाढ

इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे (ICEA) अध्यक्ष पंकज मोहिंद्रो म्हणाले की, “मोबाईल फोन निर्मितीत 1100 टक्के वाढ झाल्यानंतर देशांतर्गत मागणीत वाढ झाली आहे. यासोबत निर्यातही सुरू झाली आहे. डिसेंबरपर्यंत 50000 जणांची थेट भरती केली जाणार आहे.” मोबाईल फोन निर्मितीमधील ही 1100 टक्के वाढ 2014 ते 2019 या काळात झाली आहे.

उपलब्ध होणार 50,000 रोजगार

केंद्र सरकारनं सुरू केलेली प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटीव्ह ही योजना आता वेग घेत आहे. आता 50 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मोबाईल उत्पादन इंडस्ट्रीसाठी हे एक मोठं प्रोत्साहन ठरणार आहे.

स्पेशालिस्ट स्टाफिंग फर्म एक्सफीनो कंपनीचे सह संस्थापक कमल कारथ म्हणाले, “यातील 50 टक्के अंमलबजावणी जरी झाली तरी पहिल्या 9 ते 18 महिन्यात प्रति प्लांटमध्ये जवळपास 4000 जणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत या काळात 28 हजार पेक्षा कमी रोजगार निर्मिती व्हायला नकोत” असंही त्यांनी सांगितलं आहे.