मावळमधून ‘स्मिता पाटील’ की ‘पार्थ पवार’ ? सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील मावळ या मतदारसंघासाठी कोणत्याही पातळीवर स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी दिले आहे. इतकेच नाही तर, मावळमधून पार्थ पवार यांनीच निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. मुख्य म्हणजे पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगत असले तरी लोकसभा निवडणुकीसाठी मावळमधून त्यांच्याच नावाचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अग्रक्रमाने सुरु आहे असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा तेथील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मुख्य म्हणजे याबाबत येत्या दोन चार दिवसांत निर्णय होईल. मावळमधून दिवंगत आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांच्या नावाची कोणतीही चर्चा पक्ष पातळीवर झालेली नाही” असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे यांच्या स्पष्टीकरणानंतर आता मावळ लोकसभा मतरदारसंघातून कोण असेल याची उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मावळमध्ये तगडा उमेदवार देण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले होते. कारण मावळमध्ये तगडा उमेदवार दिला नाही तर ही जागा जिकंली जाऊ शकत नसल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला होता. पार्थ पवार यांचे समोर आल्यानंतर पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात आपले कामही सुरु केले होते. परंतु एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात नको असे शरद पवार यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी पार्थ पवार यांच्या नावावर फूली मारली. शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या नावावर फूली मारल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी पुढे आणल्याचे वृत्तही समोर आले होते. पक्षाच्या नेत्यांनीही यासंदर्भात स्मिता पाटील यांच्याशी प्राथमिक बोलणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्मिता पाटील यांच्या होकाराच्या प्रतिक्षेत आहे अशीही माहिती समोर आली होती.