राजकीय

आर. आर. पाटील यांची कन्या सुप्रिया सुळेच्या प्रचार रॅलीत

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – (अब्बास शेख) बारामती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दौंड शहर व रेल्वे परिसरात नागरिकांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे नागरिकांशी संवाद साधत असताना आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पटील-थोरात यांची अचानक एन्ट्री झाली. त्यांच्या अचानक प्रचारात सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

स्मिता या माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या असून त्या दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या सून आहेत. स्मिता पाटील-थोरात या आपले पती आनंद थोरात यांच्या सोबत महाराष्ट्राच्या पश्चिम भागाच्या दौऱ्यावर असताना त्या अचानक दौंड शहरामध्ये येऊन रॅलीत सहभागी झाल्या. त्यांच्या उपस्थितीने महिला वर्गात मोठा आनंद पहायला मिळाला.

यावेळी त्यांनी बारामती लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या सोबत रॅलीमध्ये भाग घेतला. यावेळी नागरिकांना त्यांनी अभिवादन करत सुप्रिया सुळेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. स्मिता पाटील-थोरात यांना रॅलीत पाहून अनेकांना आर.आर.आबांची आठवण झाली. तर आबांच्या अचानक जाण्याच्या दुःखाने काहींच्या डोळ्यांच्या कडा पानावल्याचेही दिसले.